Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : भूखंड प्रकरणी सह धर्मदाय आयुक्तांच्या सखोल चौकशी आदेशानंतर काळेंचे आंदोलन स्थगित

 


मंदिर ट्रस्ट भूखंड वाचवण्यासाठी संथारा घेऊन मरण पत्करेल : किरण काळे 

प्रतिनिधी : श्री ऋषभ संभव श्वेतांबर संघ जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करून त्या जागी राजकीय कार्यालयात थाटल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी सहधर्मदाय आयुक्त यांच्याकडे केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे काळेंनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांच्या कार्यालयासमोर पुण्यात धरणे आंदोलन केले. काळेंचा आक्रमक पवित्रा पाहता सह धर्मदाय आयुक्तांनी तात्काळ सखोल चौकशी करून कार्यवाहीचा कार्यपूर्तता अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश धर्मदाय उपायुक्त, अहिल्यानगर यांना काढले आहेत. 


या आदेशानंतर काळे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मात्र ही लढाई संपलेली नाही. शहर लोकप्रतिनिधी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, ट्रस्ट अध्यक्ष आणि अन्य ट्रस्टींशी अर्थपूर्ण संगनमत करून धर्म कार्यासाठीचा भूखंड हडप केला असल्याचा पुनरुच्चार करत तो समाजाला परत मिळवून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे काळे म्हणाले. वेळप्रसंगी मंदिर ट्रस्ट भूखंड वाचवण्यासाठी संथारा घेऊन मी मरण पत्करेल, अशी भीष्म प्रतिज्ञा यावेळी त्यांनी केली. 



बुधवारी सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अहिल्यानगर सह पुण्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तत्पूर्वी काळे यांनी एचएनडी जैन बोर्डिंग येथे आचार्य गुरुदेव गुप्तिनंदीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. दुपारच्या सुमारास माजी आ. रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे उपनेते गजानन कुचिक, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, शहर प्रमुख गजानन थारकुडे आदी आंदोलन स्थळी दाखल झाले. धंगेकर यांनी यशस्वी शिष्टाई केली. ठोस आश्वासनाचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर काळे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले. 


यावेळी विकेश गुंदेचा, अक्षय जैन, राजेंद्र शाह, पुनीत भंडारी, कल्पेश कटारिया, ॲड. सुकौशल जिंतूरकर, डॉ. सुजाता बरगाळे, विलास उबाळे, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, सुशांत मस्के, प्रतीक बारसे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, सुनील उबाळे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. 

या बाबींची होणार चौकशी 

देणगीदार मंगूबाई व्होरा यांनी सदर भूखंड कुणालाही विकू नये, कोणत्याही कारणास देऊ नये, केवळ धर्म कार्यासाठी वापरावा, अशा अटी व शर्ती मृत्यपत्रात घातल्या असताना देखील त्याचे उल्लंघन का केले गेले ?, शहर लोकप्रतिनिधींचे राजकीय कार्यालय तेथे कसे काय थाटले गेले ?, धर्मदाय कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता तथाकथित भाडेकरूला संपूर्ण भूखंड कसा काय दिला गेला ? भूखंड विक्रीची नोटीस कशी काय प्रसिद्ध करण्यात आली ? भूखंड विक्रीचा घाट कोणी कोणी संगनमताने घातला ? यासह अनेक बाबींची आता सखोल चौकशी याप्रकरणी होणार आहे. यातून काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आरोपांना लवकरच उत्तर देणार 

दरम्यान, ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा आणि ट्रस्टींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत किरण काळे, मनोज गुंदेचा यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. काळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments