अहिल्यानगर : माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जगताप यांच्या निधनामुळे अहिल्यानगर वर शोककळा पसरली आहे. आज (शुक्रवार) दुपारी ४ वाजता अमरधाम, अहिल्यानगर येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
जगताप यांचे निधन नगरकरांच्या मनाला चटका लावणार आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन स्वतःच्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी नगरसेवक पदापासून ते विधान परिषदेचे आमदार अशी मोठी मजल मारली होती. असंख्य चाहत्यांचा गोतावळा आपल्या शांत, संयमी स्वभावातून त्यांनी निर्माण केला होता.
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी हे त्यांचे मुळगाव. अत्यंत शून्यातून सुरुवात करत यशाच्या शिखरावर ते आपल्या कार्य कर्तृत्वातून पोहोचले होते. अहिल्यानगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे भरीव योगदान राहिले.
दुपारी दोन वाजल्यापासून भवानीनगर येथील निवासस्थानी अरुणकाका यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अंतिम पार्थिव दर्शन
आज, शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी दुपारी २ वा. निवासस्थानी, भवानीनगर, अहिल्यानगर
अंत्यविधी
आज, शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी दुपारी ४ वा.
अमरधाम, अहिल्यानगर
अंत्यविधी मार्ग
भवानीनगर, निवासस्थानापासून महात्मा फुले चौक – मार्केटयार्ड- जिल्हा सहकारी बँक – स्वस्तिक चौक- टिळक रोड मार्गे -आयुर्वेद कॉलेज बाबावाडी -नालेगाव -अमरधाम.
0 Comments