Subscribe Us

Header Ads

आमदार जगतापांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे शिवसेनेची जोरदार खलबते

 

शहर प्रमुख काळे यांच्या अध्यक्षतेखाली सारसनगर मध्ये पार पडली बैठक

काळे म्हणाले, सारसनगर विभाग टँकरमुक्त करण्यासाठी ठाकरे शिवसेना कटिबद्ध राहील

प्रतिनिधी : सारसनगर स्टेशन रोड हा विभाग गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येशी झुंजतो आहे. अनेक योजना राबविल्या गेल्या, मोठा निधी खर्च केला गेला. मात्र आजही या भागामध्ये दररोज नळाला पाणी येत नाही. पुरेशा दाबाने पाणी न येणे, अवेळी विशेषतः रात्रीच्या वेळी पाणी येणे, अस्वच्छ पाणी येणे यामुळे नागरिक हैराण, हवालदिल आहेत. दुर्दैव म्हणजे आजही या भागातील काही ठिकाणी मनपा टँकरने पाणीपुरवठा करते. पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरज भागवण्यात अपयशी ठरलेले प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना जनता आता माफ करणार नाही. आगामी मनपा निवडणुकीत या विभागात सक्षम उमेदवार शिवसेना देणार असून सारसनगर विभाग कायमचा टँकरमुक्त करण्यासाठी ठाकरे शिवसेना कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. 

शिवसेना ठाकरे पक्षाच्या सारस नगर - स्टेशन रोड विभागाची शिवसैनिकांची बैठक माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी काळे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी, माजी उपशहर प्रमुख दीपक भोसले, कामगार सेनेचे नेते विलास उबाळे, सारसनगर शिवसेनेचे विकेश गुंदेचा, शिवसेना महिला आघाडीच्या शितल त्रिपाठी, युवा सेना जिल्हाप्रमुख पप्पू भाले, माजी नगरसेवक प्रशांत ठुबे, सुदर्शन गोहेर, मिलन सिंग, गिरीश हांडे, अभय बडे, फरहान शेख, कामगार सेनेचे शहरप्रमुख गौरव ढोणे, युवा सेना अहिल्यानगर विधानसभा प्रमुख आनंद राठोड, सुनील भोसले, व्यापारी आघाडीचे महावीर मुथा, गणेश आपरे, शंकर आव्हाड, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, जयराम आखाडे, रोहिदास भालेराव, बाबासाहेब वैरागर, राजेंद्र तरटे, दिपक काकडे, विनोद शिरसाठ, सचिन कापुरे, सचिन भालेराव, किशोर कोतकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काळे पुढे म्हणाले, 

या प्रभागात, विभागात झालेले सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा अनेक ठिकाणी चांगला नाही. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरच पुन्हा डांबरीकरणाचे काम करण्याचा प्रताप मनपा प्रशासनाने केला होता. त्याचा यापूर्वीच लाईव्ह भांडाफोड आपण केला आहे. आजही परिसरात असे अनेक रस्ते आहेत की ज्यांची कामे रखडलेली आहेत. ती प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. 


सुनील त्रिपाठी म्हणाले, 

सन २००६ मध्ये समर्थ नगर या ठिकाणी या विभागाकरिता पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले. तब्बल वीस वर्ष होत आले. तरी देखील या टाकीत आजपर्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा पडलेला नाही. लाखो रुपये जनतेच्या तिजोरीतील खर्च करून देखील जनता जर लाभा पासून वंचित असेल तर एवढा मोठा खर्च करून ही टाकी बांधलीच कशासाठी, असा सवाल यावेळी त्रिपाठी यांनी उपस्थित केला. त्याआधी सन २००४ सालापासून या विभागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. आजही तो चालू आहे. शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आगामी मनपा निवडणूक ताकतीने लढवायची आहे. 

विकेश गुंदेचा म्हणाले, 

परिसरामध्ये मनपाने काही उद्यानांची कामे केली आहेत. मात्र या उद्यानांची देखभाल उद्यान विभाग करत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांचा लाभ घेता येत नाही. परिसरातील काही ओपन स्पेस हे नागरिकांसाठी खुले करण्याची गरज आहे. 

महावीर मुथा म्हणाले, 

स्टेशन रोड परिसरामध्ये काही भागांमध्ये पाण्याचा थेंब येत नाही. नागरिक वारंवार लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासनाकडे तक्रारी करून, खेटा मारून मेटाकुटीला आले आहेत. तरी यांना पाझर फुटायला तयार नाही. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत लोकांच्या प्रश्नांशी बांधिलकी असणारे उमेदवार पक्षाच्या वतीने दिले जावेत अशी मागणी मुथा यांनी केली. 

शितल त्रिपाठी म्हणाल्या, 

घनकचरा विभागाकडून कचरा संकलन नीट केले जात नाही. वास्तविक पाहता तीनशे पासष्ट दिवस घंटागाडी लोकांच्या दारात दररोज यायला पाहिजे. मात्र ती काही ठिकाणी दिवसा आड, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवसांनी येते. यामुळे नागरिकांचे, विशेषत: महिला भगिनींचे मोठे हाल होतात. ओला कचरा देखील घरात राहिल्यामुळे दुर्गंधी सुटते. यामुळे संपूर्ण कुटुंबाच्याच आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ही समस्या प्रशासनाच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. 

Post a Comment

0 Comments