आ. जगताप ती स्वीकारणार का ? नगरकरांना उत्सुकता
अहिल्यानगर : सध्या राज्यभर गाजत असलेल्या अहिल्यानगर मनपातील ७७८ रस्त्यांचा सुमारे ३५० ते ४०० कोटींच्या घोटाळ्यावरून उडत असलेली आरोपांची राळ काही थांबायला तयार नाही. यावरून राजकीय वातावरण आता अधिकच तापले आहे.
याप्रकरणी आ. संग्राम जगताप यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे शिवसेना नेते खा. संजय राऊतांवर ईडी प्रकरणावरून पलटवार करत टीका करणाऱ्या आ. जगतापांना शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळेंनी खा. राऊत लिखित "नरकातील स्वर्ग" पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे.
एवढेच नाही तर काळे यांनी आ. जगताप यांना पत्र पाठवत आमने-सामने चर्चेला येण्यासाठीचे शहर शिवसेनेच्या वतीने निमंत्रण ही दिले आहे.
त्यात काळे यांनी म्हटले आहे,
या प्रकरणात भ्रष्टाचार, घोटाळा न झाल्याचे आपले म्हणणे आहे. आपण सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहात. आपण लवकरच लोकार्पण होणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपण बाजू घेतलेल्या भ्रष्टाचारांच्या समर्थनार्थ आपल्याकडे असणारे पुरावे घेऊन यावेत. माझ्याकडे ढीगभर पुरावे आहेत. येताना आपली प्रवक्तेगिरी करणाऱ्या आयुक्त यशवंत डांगे यांनाही आणावे. तारीख, वेळ आपणच कळवावी. आपल्या बनावट आयटी पार्क बद्दल देखील यापूर्वी मी आपल्याला चर्चेचे निमंत्रण दिले होते. तेव्हा आपण पळून गेलात. आखाड्यात उतरलाच नाहीत. यावेळी मात्र आपल्या स्वभावातील भित्रेपणा बाजूला ठेवत न घाबरता जनतेच्या समोर जाहीर खुली चर्चा करण्यासाठी जरूर यावे. यामुळे आता शहर शिवसेनेने दिलेले हे निमंत्रण जगताप स्वीकारतात की नाही हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
काळे यांनी पत्रात म्हटले आहे,
सामाजिक, राजकीय आयुष्यात वावरत असताना सत्य, अहिंसेच्या मार्गावर चालणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. हुकूमशाही, दडपशाहीला न जुमानता खा. संजय राऊत यांनी लिहिलेले "नरकातील स्वर्ग" पुस्तक जरूर आपण वाचावे असे म्हणत, "तुम्ही अहिल्यानगरचा नरक केला" असा टोला लगावला आहे. जगताप यांनी खा. राऊत यांच्या केलेल्या आरोपां बद्दल पत्रात पुढे म्हटले आहे, ज्या तथाकथित पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात खा. राऊत यांना सुडाच्या राजकारणातून ईडीने अटक केली होती. त्यांना १०० दिवस आर्थर रोडच्या तुरुंगात डांबलं. राऊत यांना शरण येण्याच्या अनेक ऑफर दिल्या गेल्या. पण हे क्रांतिकारी नेतृत्व तुमच्या भ्रष्ट महायुतीपुढे, मोदी, शहां पुढे झुकलं नाही. तुरुंगातही त्यांची लेखणी थांबली नाही.
"ती" अटक राजकीय हेतूने प्रेरित
काळे म्हणाले, आपल्या माहितीसाठी सांगतो, ९ नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी राऊत यांची अटक "बेकायदेशीर" आणि "राजकीय हेतूने प्रेरित" असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. राऊत हे कधीही भ्रष्टाचार, हत्याकांड, एसपी ऑफीस हल्ला, ताबेमारी, गुंडगिरी, दहशत, दादागिरी अशा कोणत्या ही प्रकरणांमध्ये सहभागी नाहीत. मात्र अशी कृत्य करणाऱ्यांचा कर्दनकाळ आहेत. म्हणूनच या राज्यात "सौ दाऊद, एक राऊत" अशी म्हण प्रचलित झाली आहे.
लोक पंढरपूरची वारी करतात, तुम्ही तर तुरुंगवारी केली
काळेंनी पुढे म्हटलं आहे, आपण ही तुरुंगवारी केली आहे. (लोक पंढरपूरच्या वारीला जातात.) आपल्यावर शिवसैनिकांच्या केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा आरोप राहिलेला आहे. आपल्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला गेला. याबद्दल गुन्हा दाखल असून चार्जशीट देखील न्यायालयात दाखल आहे. आपण मात्र आपलं राजकीय वजन वापरून या गुन्ह्यामध्ये स्वतःचं नाव येणार नाही याची काळजी घेतली खरी. पण ज्या तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी हे कृत्य केलं त्यांना मात्र तुम्ही आयुष्यभरासाठी न्यायालयाच्या खेटा घालण्या करिता वाऱ्यावर सोडून दिलं. स्वतःच्याच कार्यकर्त्यां प्रति इतका निष्ठुर असलेला नेता आजवर अहिल्या नगरकरांनी कधी पाहिला नाही.
सूड भावनेतून आपण विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करता
काळेंनी म्हटलं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून करत असलेल्या आपल्या चुकीच्या कामांना या शहराच्या व्यापक जनहितार्थ आमची शिवसेना नेहमीच विरोध करत असते. त्यावर प्रश्न, जाब विचारत असते. मात्र मी आपल्या तथाकथीत बनावट आयटी पार्कचा पुराव्यानिशी इन कॅमेरा भांडाफोड केला म्हणून, आपण राजकीय सूड भावनेतून सत्तेचा गैरवापर करत मलाही तुरुंगात पाठविण्यासाठी, माझ्यावर एका भगिनीला पुढे करत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करायला लावला.
त्यात पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर मेहरबान न्यायालयात मी हा गुन्हा केलेलाच नाही, गुन्हा घडला त्यावेळी आपण सुपारी दिलेली भगिनी तिचा विनयभंग होण्यासाठी घटना स्थळावर उपस्थितच नव्हती, असे चार्ट शीट दाखल करत मला क्लीन चीट दिली आहे. याचे आपल्याला नक्कीच दुःख झालं असेल.
भारतरत्न डॉ.आंबेडकरां पेक्षा कोणीही मोठा नाही, आता कार्यक्रम रद्द करू नका
संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपल्या वैयक्तिक अट्टहासापोटी गेल्या अनेक महिन्यांपासून काम पूर्ण होऊन देखील आधी काळ्या, तर आता पांढऱ्या कापडा आड कोंडलेला आहे. हे योग्य नाही. मनपाने त्याच्या लोकार्पणाची तारीख आता जाहीर केली आहे. यावेळी मात्र हा कार्यक्रम आपण कृपया रद्द करू नका. तमाम भीमसैनिक आणि या देशातील संविधान प्रेमी नागरिकांच्या आस्था भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आमदार म्हणून आपले आणि आपल्या कुटुंबाचे असणारे मोठेपण यापेक्षा डॉ. आंबेडकरांचे मोठेपण कितीतरी अधिक पटींनी या देशासाठी, किंबहुना विश्वासाठी मोठे आहे. हे विसरू नका, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.
0 Comments