शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करणार ठाकरे शिवसेनेत प्रवेश
प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. मनपा प्रभाग रचने वरच्या हरकती, सूचनांवर सुनावणी झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसमध्ये मोठी उलथा पालथ झाली आहे. अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धाडले आहेत. यामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलाताई लांडे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील आप्पा लांडगे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामुळे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
खात्रीलायक सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाच वाजता मातोश्री येथे ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हाती शिवबंधन बांधत ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्यासह अन्य शिवसेना नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हे प्रवेश होत आहेत. काळे काही महिन्यांपूर्वी काँग्रेस मधून बाहेर पडत शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर रिक्त झालेल्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच दीप चव्हाण यांची वर्णी लागली होती. मात्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या शहरातील बहुतांशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा सत्र राबविल्यामुळे काँग्रेस अक्षरशः रिकामी झाली आहे.
शहर काँग्रेस नेतृत्व हीन
राजीनाम्या नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज गुंदेचा म्हणाले,
किरण काळे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असताना गतप्राण झालेल्या काँग्रेसला काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये मागील पाच वर्षात आम्ही जीवाचं रान करून बळकट करण्याचं काम केलं. काळे यांनी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिली होती. मात्र ते सक्षम उमेदवार असून देखील विधानसभेला काँग्रेस पक्षाला ही जागा सोडवून घेत त्यांना उमेदवारी देता आली नाही. ते पक्षातून बाहेर पडल्यामुळे शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल आमच्या मनामध्ये आजही अत्यंत आदराची भावना आहे. मात्र शहरामध्ये निर्भीड, आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,काळे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेत नव्या जोमाने काम करणार आहोत.
अनिस चुडीवाला म्हणाले,
सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याची शिवसेनेची भूमिका आहे. शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, महिला, जेष्ठ नागरिक, युवक अशा सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या शिवसेनेला आता किरण काळें सारखे कणखर नेतृत्व मिळालेले आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
0 Comments