पोलिसांनी मास्टरमाईंडचा शोध घ्यावा - शहर प्रमुख काळे
प्रतिनिधी : शहरामध्ये सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करतात. काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करतात. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने प्रेरित काही लोक दंगल घडवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत की काय, असा दाट संशय यातून येत आहे. या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा पोलिसांनी शोध घेऊन त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागरी समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र
निवेदनात काळे यांनी म्हटले आहे, नवरात्र उत्सव सुरू आहे. दसरा, दिवाळी सण येऊ घातले आहेत. मात्र सततच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे नागरिक भयभीत आहेत. पावसाच्या अस्मानी संकटाला ग्रामीण भागासह शहर देखील तोंड देत आहे. शहरात कचरा संकलनाचा उडालेला बोजवारा, रस्त्यांची रखडलेली कामे, रस्त्यांची झालेली चाळणी, बंद पडलेले पथदिवे, अंधारात बुडालेले शहर, किरकोळ पावसामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये शिरणारे पाणी, तुंबलेली गटारं, मोकाट कुत्र्यांनी घातलेला धुडगूस, अपुरा व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा, नागरिक, व्यापाऱ्यांना असणारा अतिक्रमणांचा त्रास या नागरी समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचे राजकीय षडयंत्र यामागे दिसत आहे. आगामी मनपा निवडणुकीकरिता हा प्रकार सुरू आहे की काय असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
...तर व्यापारी आत्महत्या होतील
शहराची बाजारपेठ वेठीस धरली जात आहे. व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची कर्ज काढून दिवाळी साठीचा माल भरलेला आहे. अशीच अशांततेची परिस्थिती राहिल्यास शेतकरी आत्महत्यां प्रमाणे व्यापाऱ्यांच्या देखील आत्महत्या झाल्या तर आश्चर्य वाटू नये, अशी भीती किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थी, पालक भयभीत
सोमवारी निर्माण झालेल्या तणावामुळे काही शाळांनी घाबरून अचानक शाळांमधून मुलांना घरी पाठवलं. मुलांच्या काळजीपोटी पालक देखील घाबरून गेले. या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे, याचा शोध प्रशासनाने जावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
समाजकंटकांवर कारवाई करा
दोन्ही समाजातील समाजकंटकांना कोण राजकीय बळ पडद्यामागून देत आहे हे जनतेला माहित आहे. नगरकर सुज्ञ आहेत. अशांतता निर्माण करणारे समाजकंटक कोणत्याही धर्माचे, पक्षाचे असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी किरण काळे यांनी केली आहे.
नागरिकांना शांततेचे आवाहन
मुठभर लोकांकडून निष्पाप लाखो सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अफवांचे पेव फुटले आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. संयम आणि शांतता बाळगावी. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.
0 Comments