अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रणित भारतीय कामगार सेनेच्या (बीकेएस) सहचिटणीस पदी मधुकर नामदेव निकम यांची निवड झाली आहे. बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी अधिकारी पदी हर्षदा मोहन पांढरे यांची निवड झाली आहे. याबद्दल अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रावजी नांगरे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्र.१ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेस आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला, शिवसेनेचे कामगार नेते विलास उबाळे, मोहन पांढरे, कल्पना पांढरे, ऋतिक पांढरे, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ आदी उपस्थित होते.
बीकेएस ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी कामगारांची मोठी संघटना आहे. अहिल्यानगर शहरामध्ये पूर्वीची एल अँड टी आणि आत्ताची स्नायडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्टि नॅशनल कंपनीमध्ये तसेच कायनेटिक कंपनीत बीकेएसची युनियन आहे.
निकम यांनी बीकेएस संघटनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून दिलेल्या भरीव योगदानाबद्दल संघटनेच्या मोठ्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बँकिंग क्षेत्रामध्ये आयबीपीएस या अवघड समजल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हर्षदा पांढरे हीने दैदिप्यमान यश मिळवले आहे. पांढरे या उत्तम स्केच आर्टिस्ट आहेत.
यावेळी किरण काळे म्हणाले,
बीकेएस ही शिवसेना परिवाराचा घटक आहे. सन १९६८ पासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी ही संघटना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बीकेएसचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. अहिल्यानगर मधील बीकेएस संघटनेच्या पाठीशी शहर शिवसेना ठामपणे उभी आहे. निकम यांचा प्रदीर्घ अनुभव कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
रावजी नांगरे म्हणाले,
मी स्वतः कामगार क्षेत्रात काम केलेले आहे. कामगारांच्या अडीअडचणींची मला कल्पना आहे. शहर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण या विचारांवर काम करते. किरण काळेंच्या माध्यमातून शहरातील बीकेएस संघटनेला बळ देण्याचे काम निश्चितपणे होईल. निकम हे धडाडीचे कामगार नेते आहेत. संघटनेने योग्य जबाबदारी देत त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. हर्षदा पांढरे हीने मिळवलेले यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी हर्षदा हिने घेतलेल्या कष्टांचे तिच्या निवडीमुळे चीज झाले आहे.
0 Comments