जो धर्माची जागा हडप करतो, तो नरकात जातो : राष्ट्रसंत गुप्तिनंदीजी महाराज
प्रतिनिधी : आ. संग्राम जगताप, ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा, गणेश गोंडाळ मला मी अहिल्यानगरच्या दिशेने विहार करत असताना वाटेत येऊन भेटले. आ. जगताप यांनी मला वचन दिल आहे की मयत माता मंगुबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेली जागा आम्ही तीन महिन्यांच्या आत समाजाला हस्तांतरित करू, असे प्रतिपादन जैन समाजाचे क्रांतिकारी राष्ट्रसंत आचार्य गुप्तिनंदीजी यांनी केले आहे. मंगळवारी त्यांनी अहिल्यानगर शहरात प्रवेश केला. त्यानंतर आनंदधाम येथे आयोजित जाहीर प्रवचनात त्यांनी ही माहिती समाजाला दिली. यावेळी हजारो श्रावक उपस्थित होते.
ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी आ. जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करून त्यावर आपले राजकीय कार्यालय थाटल्याचा आरोप केला होता. किरण काळे, मनोज गुंदेचा, विकेश गुंदेचा यांच्यासह अनेक लोकांनी एकत्र येत पुण्यात धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर या प्रकरणी चौकशी करण्याकरिता धरणे आंदोलन केले होते. पुण्यात जैन एचएनडी बोर्डिंग भूखंड वाचण्यात महत्वपूर्ण नेतृत्व करणाऱ्या गुप्तिनंदीजी यांची भेट घेत काळे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली होती. त्यानंतर पुण्यातून त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जगताप यांना याप्रकरणी समाजाशी न्याय करण्याचे आवाहन केले होते. अन्यथा अहिल्यानगर मध्ये येऊन उपोषण, आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र गुप्तीनंदीजी अहिल्यानगर मध्ये पोहोचण्यापूर्वीच आ.जगताप यांनी त्यांची भेट घेत भूखंड तीन महिन्यात हस्तांतरित करण्याचे वचन दिल्याने अखेर या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. अहिल्यानगर शहरात दाखल होताच जैन समाजाने मोठ्या संख्येने एकत्र होत गुप्तिनंदीजी यांचे स्वागत केले.
प्रवचना वेळी बोलताना गुप्तिनंदी जी म्हणाले,
एचएनडी प्रकरणात पंधरा बुलडोजर, दोनशे पेक्षा जास्त पोलीस एचएनडी तोडण्याच्या तयारीत होते. पण माझ्या जिवंतपणी मी बुलडोजर चालू देणार नाही, असा इशारा त्यांना दिला. सुरुवातीला याप्रकरणी पोलीस तक्रार घेत नव्हते. कोणी नेता ऐकायला तयार नव्हता. मात्र त्याबाबत सकल जैन समाज एकत्र झाला. मोर्चे निघाले. त्या प्रकरणात अखेर आपला विजय झाला.
ते पुढे म्हणाले, अहिल्यानगरच्या भूखंड प्रकरणासाठी ज्यांनी संघर्ष केला, आवाज उठवला, धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा केला त्यांना मी आशीर्वाद देतो. आ.जगताप, गोंडाळ यांना देखील आशीर्वाद देतो. मी सर्वांना क्षमा करतो. मी भगवान महावीर स्वामींचा पुजारी आहे. कोणाचही शोषण करू नये. ही शिकवण त्यांनी दिली आहे. धर्मांच्या जागांवर कुणी कब्जा करून मोठा होऊ शकत नाही. कारण तिथल्या शक्ती तुम्हाला कधीही सफल होऊ देणार नाही. आपल्या धर्माच्या जागांसाठी आपल्याला जागृत राहावे लागेल. तो आपला हक्क आहे. आपली लढाई अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आहे.
गुप्तिनंदीजी भूखंड पाहण्यासाठी निघाले मात्र...
शहरात प्रवेश करताच स्वागत झाल्यानंतर गुप्तिनंदीजी विवादित भूखंडावर जाण्यासाठी निघाले. मात्र गणेश गोंडाळ यांनी तिथे जाण्यासाठी रस्ता बंद आहे असे सांगितल्याची माहिती स्वतः गुप्तिनंदीजी यांनी आपल्या प्रवचनात दिली. मयत माता मुंगूबाई यांना त्यांनी यावेळी आशीर्वाद देत सगळ्यांनी आपल्या आयुष्यात त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
जैन ट्रस्टच्या ट्रस्टींचे टोचले कान
ट्रस्टचा विश्वस्तांनी समाजाच्या विश्वासास कायम पात्र राहिल पाहिजे. जे ट्रस्टी धर्म, समाज, शिक्षण यासाठी काम करतात त्यांना माझा आशीर्वाद आहे. पण मी अन्य ट्रस्टींना इशारा देतो की, ज्यांनी कोणी दान केलेली जमीन हडप केली आहे, मग तो कोणीही असो, तो आजपर्यंत कधी सुखी झाला नाही. त्याची महाबरबादी झाली आहे. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत, असे म्हणत गुप्तिनंदीजी यांनी यावेळी ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ मंदिर ट्रस्टच्या ट्रस्टींचे चांगलेच कान टोचले.
ऐतिहासिक क्षण
यावेळी आचार्य भगवंत श्री महाबोधी सूरिश्वरजी महाराज, कुंदनऋषीजी महाराज, अलोकऋषीजी महाराज यांचे देखील प्रवचन पार पडले. अहिल्यानगरच्या इतिहासात पहिल्यांदाच सकल जैन समाजातील दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही पंथांचं आचरण करणाऱ्या संतांना एकत्रित पाहण्याची, ऐकण्याची पर्वणी अहिल्यानगरवासियांना मिळाली. हजारो श्रावकांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला.






0 Comments