Subscribe Us

Header Ads

रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना खंबीरपणे उभी — आ. सुनील शिंदे

 


उपोषणकर्त्या माथाडी कामगारांच्या यशस्वी लढ्याचे ठाकरे शिवसेना आ. सुनील शिंदे यांच्याकडून कौतुक

रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना खंबीरपणे उभी : आ. शिंदे


प्रतिनिधी : अहिल्यानगर रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने दखल घेतल्यानंतर कामगारांच्या लढ्याला यश मिळाले. या यशस्वी लढ्याचे ठाकरे शिवसेनेचे आ. सुनील शिंदे यांनी कौतुक केले असून, “रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी ठाकरे शिवसेना सदैव खंबीरपणे कामगारांच्या पाठीशी उभी आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपोषणकर्ते शिवसेना कामगार आघाडीचे विलास उबाळे, विनोद शिरसाट यांचा या यशस्वी लढाई बद्दल प्रातिनिधिक स्वरुपात आ. सुनील शिंदे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कामगारांच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. यावेळी महानगर प्रमुख किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक आघाडीचे अनिस चुडीवाला, महिला आघाडीच्या नलिनी गायकवाड, रजनी ताठे, उषा भगत, शैला लांडे, शंकर आव्हाड, विकास भिंगारदिवे, आकाश अल्हाट आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे कामगार प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मागण्यांबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही ठोस निर्णय किंवा लेखी उत्तर मिळत नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता.

कामगार नेते विलास उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी पाठिंबा देत कामगारांच्या मागण्या आमदार सुनील शिंदे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर आमदार शिंदे यांनी प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून उपोषणकर्त्या कामगारांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली आणि कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी बोलताना महानगर प्रमुख किरण काळे म्हणाले, 

“रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगार हे ठाकरे शिवसेना परिवाराचे सदस्य आहेत. यापूर्वी शहरातून काढलेल्या आक्रोश मोर्चामुळेच कामगारांना कोट्यवधी रुपयांचा थकीत हप्ता मिळाला होता. सत्ता असो अथवा नसो, शिवसेनेच्या मनगटामध्ये कामगारांना न्याय मिळवून देण्याची ताकद आणि धमक आजही आहे.”

“रेल्वे मालधक्का हा आमच्यासाठी केवळ राजकारणाचा विषय नाही. कामगार बांधवांचे प्रश्न सोडवणे हा आमचा सामाजिक दृष्टिकोन आहे. हे कामगार आमच्या परिवाराचा भाग आहेत आणि त्यांच्या न्यायासाठी लढणे ही आमची कौटुंबिक जबाबदारी आहे,” असेही काळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी विलास उबाळे म्हणाले, 

“महानगर प्रमुख किरण भाऊ काळे यांच्या माध्यमातून आमचा उपोषणाचा विषय आमदार सुनील शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आला. किरण भाऊ यांनी आमदार शिंदे यांचे प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे बोलणे करून दिले. त्यामुळे प्रशासनाला चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी लागली. शेवटी हा कामगारांच्या एकजुटीचा विजय ठरला.”

“कामगारांच्या न्यायासाठी वैयक्तिक नुकसान सोसावे लागले तरी चालेल; मात्र घेतलेला वसा सोडणार नाही. उर्वरित वसुली आणि अन्य मागण्यांबाबत दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत तर पुन्हा एल्गार केला जाईल. मात्र अशी वेळ प्रशासन आणणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे,” असे उबाळे यावेळी म्हणाले. 

Post a Comment

0 Comments