Subscribe Us

Header Ads

Crime Update - कोतवालीचे माजी पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

 


ॲड. राहुल पवार यांच्या युक्तिवादानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय 

अहिल्यानगर प्रतिनिधी : बलात्कारासह मारहाण, वाहनाचे नुकसान, शिवीगाळ आणि धमकीच्या गंभीर आरोपांनी गाजलेल्या खटल्यात अखेर कोतवाली पोलीस स्टेशनचे माजी पोलीस निरीक्षक विकास दौलतराव वाघ यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला. आरोपीच्या बाजूने ॲड. राहुल (आर. एम.) पवार आणि ॲड. सागर टाक यांनी बाजू मांडली. न्यायालयाने अभियोजन पक्षाला आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करता आले नसल्याचे नमूद करत आरोपीला निर्दोष मुक्त केले.

न्यायालयीन नोंदीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची २०१९ मध्ये ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील परिसरात दोघांमध्ये वाद व झटापट झाल्याची घटना घडली. त्याच दिवशी रात्री आरोपीने फिर्यादीला मिस्किन मळा परिसरात बोलावून तिच्यावर इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तपासानंतर आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३२३, ४२७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत खटला चालविण्यात आला. खटल्यात अभियोजन पक्षाने सहा साक्षीदार तपासले. बचाव पक्षानेही स्वतंत्र साक्षीदारांसह विविध दस्तऐवजी पुरावे न्यायालयासमोर ठेवले. या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲड. पवार व ॲड. टाक यांनी फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करत बचाव पक्षाची बाजू ठामपणे मांडली.

खटल्यातील पुराव्यांचे बारकाईने परीक्षण करताना न्यायालयाने फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय पुरावे तसेच मोबाईलच्या कॉल डिटेल्स व लोकेशनसह उपलब्ध परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार केला. न्यायालयाने आपल्या निर्णयात वैद्यकीय पुरावे फिर्यादीच्या कथनाला पुरेसा आधार देत नसल्याचे नमूद केले. तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणीतील मुद्दे तसेच संपूर्ण पुराव्यांचे परीक्षण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सुमारे पाच वर्षे न्यायप्रविष्ट राहिलेल्या या खटल्याचा अखेर आरोपीच्या बाजूने निकाल लागला असून, ॲड. पवार व ॲड. टाक यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर आणि बचाव पक्षाच्या पुराव्यांचा विचार करून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

Post a Comment

0 Comments