अहिल्यानगर : १४ एप्रिल... सबंध हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रचंड प्रमाणावर लोकांच्या सहभागातून साजरी केली जाते. वाडी, वस्ती, गाव, तालुका, शहर, जिल्हा, जिथे - जिथे म्हणून बाबासाहेबांचे पुतळे त्यांची प्रेरणा देत उभे ठाकले आहेत तिथे - तिथे भीम सैनिक, संविधान प्रेमी नागरिक बाबासाहेबांना त्यांच्या जयंती दिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात. अहिल्यानगर देखील याला अपवाद नाही.
सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या संघर्षा नंतर जनतेच्या पैशातून, सरकारच्या माध्यमातून, स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने थोडे थीडके नव्हे तर तब्बल ७५ लाख रूपये खर्चून स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात सुमारे २८ फुटी (पुतळा दहा फूट व चौथरा अठरा फूट) पुतळा उभारण्यात आला आहे.
पुतळा, चौथरा, नवीन संसद भवनाच्या प्रतिकृतीसह परिसर सुशोभिकरण, संरक्षण भिंत, बगीचा व अन्य आवश्यक सुविधा आदी सर्व कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. हा अहिल्यानगरकरांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे.
पूर्णाकृती पुतळाच्या उभारणी नंतर लोकार्पणाची अखेर तारीख ठरली... १० एप्रिल.. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा ठरला... सगळ्यांना अवतान धाडलं गेलं... नगरकर डोळ्यांमध्ये त्राण आणून १० एप्रिलचा सूर्योदय होण्याची वाट पाहत होते... प्रचंड जल्लोष, उत्साह, आनंद उराशी बाळगून बाबासाहेबांच्या अहिल्यानगर मधील पहिल्या वहिल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाचा सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी अनेकांनी तयारी केली होती...
पण त्याआधीच सोहळा रद्द करण्याची घोषणा केली... समस्त भीम प्रेमींचा हिरमोड झाला...
जे कारण लोकार्पण रद्द करण्यासाठी दिलं गेलं ते अनेकांना अचंबित करून गेलं. ज्या भारतीय समाज व्यवस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता, असमानता, जातिभेद, सामाजिक - आर्थिक - शैक्षणिक मागासलेपणाच्या अंध:कारातून भारतीय संविधानाच्या माध्यमातून लख्ख प्रकाशाच्या मार्गावर आणलं, दीन दलितांचा, गोरगरिबांचा, प्रत्येक भारतीयाचा खऱ्या अर्थाने उद्धार केला, त्याच बाबासाहेबांचा लोकार्पणासाठी सज्ज असलेला पुतळा ऐन जयंतीच्या दिवशी चोहो बाजूंनी काळया कापडाच्या आड अंधारामध्ये कोंडला गेला...
होय कोंडलाच गेला... पुतळ्याचा श्वास गुदमरला आणि भीम प्रेमींचा देखील...
काल जयंती निमित्त एसटी स्टँड जवळील आंबेडकर चौकामध्ये हजारोंच्या संख्येने भीमप्रेमी पूर्णाकृती पुतळा पाहण्यासाठी, त्याला हार घालून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमत होते. मात्र त्यांना दिसत होता काळया कापडा आड कोंडलेला पुतळा.
- भीम प्रेमींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की ज्यांना आपण भारतरत्न, सबंध जगाचं विश्वरत्न म्हणतो ते बाबासाहेब आंबेडकर मोठे की आजच्या खोके सरकारच्या काळातील नैतिकता गमावलेल्या राजकीय पक्षाचा एखादा नेता मोठा ?
- बाबासाहेबांचं कर्तुत्व मोठं की ज्या राजकीय नेत्यासाठी लोकार्पण सोहळा रद्द केला त्या नेत्याचं कर्तृत्व मोठं ?
म्हणजे बाबासाहेबांची थेट एखाद्या स्थानिक गाव पुढार्याशी (पात्रता नसतानाही) या निमित्ताने तुलना होण्याची ही जगभरातील पहिलीच घटना असावी.
सुखं - दुःखं प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि सध्या चर्चेत असणारे सामाजिक कार्यकर्ते किरण माने यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं.
तेरावा होईपर्यंत गावाची वेस ओलांडायची नाही अशी आपल्याकडे प्रथा आहे. मात्र मानेंनी जाहीर केलं, की मी ही प्रथा मोडतोय. माझ्या वैयक्तिक दुःखापेक्षा क्रांतीसुर्य महात्मा फुले, महामानव डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भर दौरे करत समाजाच प्रबोधन करण हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो.
माने हे ही सांगायला विसरले नाहीत की माझ्या दिवंगत वडिलांना देखील समाज प्रबोधनाच कार्य सोडून मी विधी करण्यामध्ये स्वतःला अडकवून घेतलेल कदापी आवडलं नसतं.
किरण माने यांची फेसबुक पोस्ट त्यांच्या वॉल वरून साभार :
एकीकडे मानें सारखी आत्ताच्याच समकालीन समाजामध्ये आदर्श उदाहरणं समोर असताना दुसरीकडे मात्र जनतेच्या, शासनाच्या पैशां मधून महापुरुषाच्या उभ्या राहिलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचं राजकीय श्रेय घेण्याच्या हव्यासापोटी आपण महामानव डॉ. आंबेडकरां पेक्षा अन्य कुणाला तरी मोठ स्थान देत आहोत याचा सोयीस्कर विसर संबंधित युवा लोकप्रतिनिधींना पडला. हे अहिल्यानगरचं दुर्दैव.
त्यांच्या दावणीला असणाऱ्या त्यांच्या मर्जीतील तथाकथित मूठभर लाभार्थ्यांनी बाबासाहेबांच्या दैदीप्यमान कार्या पेक्षाही अधिकच महत्व हे आपल्या राजकीय वैयक्तिक स्वार्थासाठी संबंधित लोकप्रतिनिधीशी बांधिलकी जपण्याला दिलं. जर ही मूठभर मंडळी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय नेत्याला महामानव डॉ. बाबासाहेबां पेक्षा अधिकचं महत्त्व देत असेल तर याचा अर्थ समाजाने काय समजायचा ?
काल जयंतीदिनी आलेला प्रत्येक भीम प्रेमी काळया पडद्याआड कोंडलेला पुतळा पाहून हळहळत होता. हिरमुसून जात होता.
ज्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार होतं ते केंद्रीय मंत्री पासवान अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले खरे मात्र कुटुंबासह शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या घरचा पाहुणचार घेऊन पुतळ्याचे अनावरण न करताच परतले.
शहराच्या लोकप्रतिनिधींचं वैयक्तिक दुःख त्यांच्यासाठी नक्कीच मोठ असेल, याबद्दल तीळ मात्र ही शंका नाही. त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची भावना जर कुणाची असेल तर त्यातही नक्कीच काही गैर नाही. परमेश्वर त्यांना या दुःखातून लवकर सावरो.
परंतु एकीकडे किरण मानें सारखे आदर्श समाजासमोर असताना दुसरीकडे केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी बाबासाहेबांना महत्त्व न देता आपल्या राजकीय श्रेयवादाला महत्व दिलं गेलं. हे अहिल्यानगरच्या सामाजिक - राजकीय प्रगल्भतेला लाज वाटावी अस कृत्य दुर्दैवानं भीम प्रेमींना अनुभवायला मिळालं.
जर कुणाला याचं श्रेय घ्यायचं होतं तर ते त्यांनी जरूर घ्यायला हरकत नव्हती. फक्त पुतळा जयंती दिनी भीम प्रेमींना अभिवादना साठी खुला करून द्यायला हवा होता. तशी मागणी देखील आंबेडकरी समाज, भीम प्रेमींच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते योगेश साठे, सुशील कदम, अतुल साळवे, मुकेश झोडगे, निखिल शेलार, हनीफ शेख आदींनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
राजकीय दबावामुळे त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. एवढच नाही तर जयंती दिनी अभिवादनासाठी आलेल्या अनेकांनी काळया पडद्या आड कोंडलेल्या पुतळ्याचा फोटो समाज माध्यमांवर आपल्या स्टेटसला ठेवत पुतळा अभिवादनासाठी खुला न केल्याचा निषेध जाहीररित्या नोंदवला. त्यावर अनेक सोशल मीडिया ग्रुप वर चर्चा होताना देखील पाहायला मिळाल्या.
- तथाकथित मूठभर लोकांनी अनावरणाचा कार्यक्रम का आणि कोणाच्या सांगण्या वरून रद्द केला ?
- ही मूठभर मंडळी म्हणजे सर्व समाज आहेत का?
- या मूठभर मंडळींनी बाबासाहेबांना महत्व का दिलं नाही ?
- काही मूठभर लोकांना समाज कुण्या एका राजकीय नेतृत्वाच्या दावणीला बांधायचा आहे का ?
असे अनेक प्रश्न सध्या समाज विचारत आहे. पण दबक्या आवाजात. त्याची कारण सर्वश्रुत आहेत.
हे सर्व घडत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त काय करत होते, हा सवाल भीम प्रेमींच्या मनामध्ये घर करून गेला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब, आम्हा अहिल्यानगरकरांना (जमलं तर) माफ करा... ! आम्ही तुम्हाला काळया पडद्या आड कोंडलं, आम्ही नाक रगडून माफी मागतो...
शेवटी एकच प्रश्न अंतर्मुख होऊन आपल्या मनाला विचारला पाहिजे,
विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे की मुठभर राजकीय स्वार्थासाठी लांगूल - चालन करणारे तथाकथित लाभार्थी आणि त्यांचे तथाकथित नेते मोठे ?
जय भीम ! जय संविधान !
0 Comments