Subscribe Us

Header Ads

"नगरचे भूषण" हरपले... शहराचा इतिहास जपणाऱ्या निस्सिम साधकाला अखेरचा सलाम


"नगरचे भूषण" हरपले... शहराचा इतिहास जपणाऱ्या निस्सिम साधकाला अखेरचा सलाम 

किरण काळे, महानगर प्रमुख, अहिल्यानगर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख

अहिल्यानगरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या विश्वातील एक महत्त्वाचा दुवा कायमचा हरपला आहे. नगरच्या इतिहासाचा चालता-बोलता कोश, निजामी इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, रेडिओ नगरचे माजी संचालक आणि ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना आपल्या शहराच्या इतिहासाशी जोडणारे स्व. भूषण गोपाळ देशमुख यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. 

काही व्यक्तींचं अस्तित्व हे केवळ त्यांच्या कुटुंबापुरतं किंवा मित्र परिवारापुरतं मर्यादित नसतं. त्या व्यक्ती एखाद्या शहराच्या सामूहिक स्मृतीचा भाग बनलेल्या असतात. भूषण देशमुख हे अशाच व्यक्तिमत्त्वां पैकी एक होते. नगरच्या इतिहासातील प्रत्येक पाऊलखूण, प्रत्येक वास्तू, प्रत्येक घटना आणि प्रत्येक संदर्भ यांचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. त्यामुळेच नगरच्या इतिहासाबद्दल कोणताही प्रश्न निर्माण झाला की सहजपणे एकच नाव समोर यायचं — भूषण देशमुख. त्यांच्या निधनाने नगरने केवळ एक इतिहास संशोधक गमावलेला नाही, तर आपल्या सांस्कृतिक स्मृती जपणारा, शहराच्या अस्मितेचा अभिमानी संरक्षक आणि ज्ञानाचा एक महत्त्वाचा स्रोत गमावला आहे.

नगरच्या गल्ली-बोळात फिरताना, ऐतिहासिक वास्तूंकडे पाहताना किंवा शहराच्या सांस्कृतिक वारशा बद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसणारी चमक कायम अनेकांच्या स्मरणात राहील. त्यांनी शहराचा इतिहास केवळ अभ्यासला नाही, तर तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आयुष्यभर केलं. ‘हेरिटेज वॉक’च्या माध्यमातून त्यांनी हजारो नगरकरांना आपल्या शहराचा इतिहास नव्याने दाखवला. अनेकांना प्रथमच आपल्या शहराचा अभिमान वाटावा, अशी जाणीव निर्माण केली.

पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं होतं. अभ्यासू वृत्ती, तथ्यांवर आधारित लेखन, प्रसिद्धीपासून दूर राहण्याची सवय आणि विषयाचा गाभा समजून घेण्याची हातोटी यामुळे त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली. स्नेहालयच्या ९०.४ एफएम रेडिओचे संचालक म्हणून त्यांनी सामाजिक जाणीवा आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचं काम केलं. तीन वर्षांपूर्वी त्यांनी माझी रेडिओ नगर साठी एक तासांची विस्तृत मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी विचारलेला प्रत्येक प्रश्न हा त्यांचा शहराबद्दल असणारा सखोल अभ्यास आणि तळमळ ध्वनीत करणारा होता. 

भूषण सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे कलावंत, साहित्यिक, अभ्यासक आणि तरुणांशी त्यांचं असणार कमालीच ट्युनिंग. शहरातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रे, लेखन, संशोधन किंवा सांस्कृतिक उपक्रम असोत, त्यांनी प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिली. त्याचा आपल्या इतिहास जपण्याच्या कार्यात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. स्वतःकडे ज्ञानाचा अथांग सागर असूनही त्याचा गर्व कधीच केला नाही. उलट इतरांना शिकवण्यात आणि पुढे आणण्यातच त्यांना आनंद वाटत असे.

आज त्यांच्या जाण्याने अहिल्यानगरने केवळ आपल्या शहराच्या इतिहासाची जपणूक करणारा एक निस्सीम साधक गमावलेला नाही, तर आपल्या इतिहासावर प्रेम करायला शिकवणारा एक शिक्षक, पत्रकारितेचा निष्ठावान प्रवासी, संस्कृतीचा जपणूकदार आणि असंख्य नगरकरांचा स्नेही गमावला आहे.

त्यांचा आणि माझा चांगला ऋणानुबंध होता. मी शहर काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना एकदा त्यांचा मला फोन केला. पं.जवाहरलाल नेहरू नगरच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले काही हस्तलिखित दस्तऐवज राहुल गांधी कुटुंबीयांच्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये आहेत. त्यांची जर फोटोकॉपी आपल्याला मिळू शकली तर हा ऐतिहासिक दस्तऐवज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील पर्यटकांसाठी उपलब्ध होऊ शकेल अशी त्यांची तळमळ होती. मी ही त्यासाठी प्रयत्न केले. पण अजून हे काम अपूर्ण आहे. त्या आधीच देशमुख यांनी आपल्यातून मनाला चटका लावणारी एक्झिट घेतली आहे. 

अगदी त्यांना सर्पदंश होण्याच्या काही दिवस आधी त्यांचा मला शेवटचा फोन आला होता. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सतत शहराच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहात. सध्या शहराच्या रखडलेल्या विकासाच्या प्रश्नांवर रेडिओ नगर साठी मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी लवकर भेटूयात असं ते म्हणाले. पण आता ती भेट कधीच होणार नाही. ही मनाला अत्यंत वेदना देणारी भावना आहे. 

भूषण देशमुखां विषयी बोलताना एकच भावना व्यक्त करावीशी वाटते — “ज्या माणसाच्या शब्दांत इतिहास जिवंत होत होता, तो माणूस आज इतिहासाचा भाग झाला आहे.”

त्यांच्या स्मृती नगरच्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूमध्ये, प्रत्येक वारसा फेरीत, प्रत्येक संशोधकाच्या पुस्तकात आणि आपल्या शहरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नगरकराच्या मनात कायम जिवंत राहतील.

मी स्व. भूषण देशमुख यांना अहिल्यानगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आणि माझ्या काळे कुटुंबीयांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो ! 

“माणूस जातो, पण त्याने जपलेला वारसा आणि दिलेली प्रेरणा अमर राहते. स्व. देशमुखांचं कार्यही असेच नगरच्या इतिहासात अजरामर राहील.”



Post a Comment

0 Comments