Subscribe Us

Header Ads

Breaking : अहो आमदार महोदय, गुन्हे दाखल करायची भाषा काय करता ? आधी स्वतः आरशात पहा... तुम्हीच सूत्रधार आहात

अहिल्यानगर प्रतिनिधी : शहरातील रस्ते, ओढे-नाले, सीना नदी, अतिक्रमणे, पूर नियंत्रण रेषा प्रकरण, नगररचनातील अनागोंदी, अधिकाऱ्यांचे संगनमत यावर शहराच्या लोकप्रतिनिधींनी केलेली वक्तव्य पाहिली की प्रश्न पडतो – हे विरोधी पक्षाचे नेते आहेत की सत्ताधारी आमदार? त्यांनी स्वतः आधी आरशात पाहावे. तुम्ही ज्या व्यवस्थेवर गुन्हे दाखल करा म्हणता, तिचे सूत्रधार तुम्हीच आहात! 'मी मारल्या सारखं करतो, तू रडल्या सारखं कर', ही स्क्रिप्ट आता नगरकरांना पाठ झाली आहे. नगरकरांना वेड्यात काढण्याची नौटंकी अजून किती काळ चालणार?, नगर रचनाच्या चारठाणकर, जोशीच्या हातून शहराची वाट कोणी लावली ?, असा सवाल ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. 

एकविरा चौक ते तपोवन रोड कॉंक्रिटीकरण कामाच्या पाहणी वेळी बोलताना शहर लोकप्रतिनिधींनी नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केले होते. 


त्याचा समाचार घेताना काळे म्हणाले, 

तुम्हीच आमदार. महापौर तुमचाच (अगदी घरातला). तुमच्या पक्षाचे २७ नगरसेवक. तुमच्या सहकारी भाजपचे २५ नगरसेवक. एमआयएमचे २ नगरसेवक ही तुमचेच. मंत्रालयात आपले वजन खर्च करून ज्यांची बदली तुम्ही करून आणली ते आयुक्तही तुमचेच. इतर अधिकारीही तुमचेच. राज्यात सरकारही तुमचेच. त्यामुळे या शहरात आज तुम्हीच सबकुछ आहात. मग मागणी कसली करता ? सगळ्या पोलिस स्टेशनच्या पोस्टिंगही तुम्हीच केल्यात. मग तुम्ही स्वतःच फिर्यादी का होत नाही? मुळ प्रश्न हा आहे की, हे सगळं गेली अनेक वर्षे घडत असताना तुम्ही कुठं होते ? गप्प का होते? 


नगर रचनाच्या "त्यांनी" शहराची वाट लावली 

चारठाणकर, जोशीला नगररचनाच्या खुर्चीवर कोणी बसवल ? त्या काळात शहरातील किती ओढे, नाले मर्जीतल्या बिल्डरांच्या घशात घातले ? किती बेकायदेशीर लेआउट मंजूर केले गेले ? किती चुकीच्या बांधकाम परवानग्या दिल्या ? किती शिव रस्ते गिळंकृत करून त्यावर टॉवर उभे केले ? यातून गोळा झालेल्या कोट्यावधी रुपयांचा मलिदा कोणी कोणी वाटून खाल्ला? नगररचनाची अति महत्त्वाची कोणती फाईल चोरीला गेली ? ती कोणी आणि का गायब केली ? गुन्हा दाखल होऊन देखील त्याचा तपास का लागला नाही ? या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी जाहीर मागणी किरण काळे यांनी केली आहे. 

नगर रचनाच्या डोक्यावर कोणत्या बलाढ्य नेत्याचा हात ?

राजकीय वरदहस्त असणाऱ्या त्या बिल्डर, अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची खरंचच गरज आहे. त्यासाठी पोलिसी तपास आवश्यक आहे. चारठणकर हे केवळ एक नाव आहे. ही यादी फार मोठी असून नगर रचनामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. चारठणकर, जोशीच्या कार्यकाळात शहराची प्रचंड वाट लागली. नगर रचनाकाराच्या डोक्यावर कोणत्या बलाढ्य नेत्याचा हात होता आणि आहे, याची चौकशी झाली पाहिजे. आत्ताही नगर रचनामध्ये राजरोसपणे प्रचंड अनागोंदी सुरू आहे. हिम्मत असेल तर त्यांनी गुन्हे दाखलच करून दाखवावेत, असे थेट जाहीर आव्हान काळे यांनी ठाकरे शिवसेनेच्या वतीने दिले आहे. 

पोलीस तपासात " ते "ओकायला लागले, तर पळता भुई थोडी होईल 

जेव्हा खरोखर गुन्हे दाखल कराल (जे तुम्ही करणार नाही), तेव्हा त्यामध्ये तुमच्याच मर्जीतले ठेकेदार, बिल्डर, अधिकारी, कर्मचारी यांची लांबलचक यादी असेल. आरोपी म्हणून जेव्हा या सगळ्यांनी केलेली गैरकायदेशीर कामे त्यांना कोणी करायला सांगितली याचा प्रत्यक्ष जबाब नोंदवण्याची पोलीस तपासात जेव्हा वेळ येईल, तेव्हा त्यांनी जर खरं ओकायला सुरुवात केली तर कोणाचे धाबे दणाणतील, कोणाची पळता भुई थोडी होईल हे सांगण्याची गरज नाही. त्यावेळी आयुर्वेदचा डोस चालणार नाही. अँलोपॅथी उपचार घ्यावे लागतील. वेळ प्रसंगी क्रिटिकल सर्जरी करावी लागेल, असा टोला किरण काळे यांनी लगावला आहे

Post a Comment

0 Comments